छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ३२ वा नामविस्तार दिनानिमित्ताने शहरात मोठा उत्साह आहे. आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटवर मोठ्या संख्येने सामाजिक संघटनांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले, तर उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची आठवण करून दिली. सकाळी कार्यक्रमाची सुरुवात मिलिंद महाविद्यालयापासून झाली. विद्यापीठ गेटपर्यंत बौद्ध महासभेच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध सामाजिक संघटनांचे सदस्य सहभागी झाले. रॅलीत विद्यार्थी, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले असून त्यांनी विविध घोषणाबाजी, बॅनर आणि पोस्टर्सद्वारे डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार केला. याशिवाय सध्या राजकीय वातावरण असल्याने महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी शंभर टक्के मतदान करावे अशी जनजागृती करण्यात आली. याशिवाय महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने भिमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. याशिवाय यावेळी विविध रांगोळीतून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
सामाजिक उपक्रमांनी जपली सामाजिक बांधिलकी
रॅलीदरम्यान उपस्थितांना पाणी वाटप करून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रम अधिक सुव्यवस्थित आणि आनंददायी झाला. यावेळी रक्तदान शिबिर घेऊन रक्तदानावर जनजागृती करत रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असा संदेश देण्यात आला. तसेच अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांना पाणी, फळ, समोसे वाटप करून अन्नदानावर जनजागृती करत सामाजिक बांधिलकी जपत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.
वाचन संस्कृतीवर टाकला प्रकाश
विद्यापीठ गेट परिसरात विविध प्रकारच्या स्टॉल्स लावण्यात आले. जवळपास १०० ते १५० स्टॉल्स लावण्यात यावेळी आले. या स्टॉल्समध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा, त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपत्रके आणि विविध पुस्तकांचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संघटनांनी आपापले स्टॉल्स लावून उपस्थितांना माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण केली. याशिवाय अनेकांनी पुस्तके घेऊन वाचन संस्कृतीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करून, त्यांच्या विचारांचे पालन करण्याचे आवाहन केले गेले. विविध संघटनांनी त्यांच्या कार्याचा आदर व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.














